आंतरजातीय विवाह केल्यास मिळतायत 50 हजार रुपये!

0
953
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासनाकडून समाजातील जातीभेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. शासनाच्यावतीने ही योजना राबविण्यात येत आहे. मागील सुमारे पावणे दोन वर्षात ३४० दाम्पत्यांना योजनेचा लाभदेण्यात आलेला आहे. सध्या समाजकल्याण विभागाकडे २८२ दाम्पत्यांचे अर्ज प्राप्त असून त्यांना लाभ देण्यासाठी १ कोटी ४१ लाख रुपयांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे.

काय आहे आंतरजातीय विवाह योजना?

शासन निर्णयानुसार जातीच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. ही योजना अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती तसेच दुसरी व्यक्ती ही सवर्ण हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत यामधील असेल तर अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो.

असे मिळते जोडप्यांना अनुदान…

सामाजिक न्याय व सास्कृतिक कार्य, क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०१० अन्वये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार ५० हजार रुपये मिळतात. १५ हजारांवरून ही रक्कम वाढविण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना अशी मिळते मदत…

लाभार्थ्यांच्या अर्जाबरोबरच्या कागदपत्रांची छाननी होते. सादर केलेला विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीच्या दाखल्यावर मूळ प्रतीच्या मागील बाजूस आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. असा शिक्का मारण्यात येतो. त्यानंतर लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते.

प्रस्ताव सादर करावा लागतो…

या योजनेसाठी अर्ज करताना वराचे वय २१ आणि वधूचे १८ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दोघांनी विवाह केल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.