सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील अंधारी येथील संजय शेलार खून प्रकरणातील संशयितास आश्रय दिल्याप्रकरणी मिरजेतील दोघांना पोलिसांनी अटक केली. अजिंक्य विजय गवळी (रा. मिरज), प्रशांत मधुकर शिंत्रे (रा. बेळंकी ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत.
खून प्रकरणातील मुख्य संशयित अरुण बाजीराव कापसे (रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) रामचंद्र तुकाराम दुबळे (रा. शाहूपुरी, ता. सातारा), विकास अवधूत सावंत (रा. मोळाचा ओढा) या तिघांना यापूर्वीच अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की अंधारी येथे दोन जानेवारीला संजय गणपत शेलार यांचा मृतदेह आढळून आला होता. याची नोंद मेढा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, हा आकस्मित मृत्यू नसून खून असल्याचा संशय संजय यांच्या कुटुंबीयांनी तसेच अंधारी ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे मृत संजय शेलार यांची पत्नी रसिका शेलार हिने आपल्या पतीचा खून झाला असल्याबाबतची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी या तक्रारीवरून हॉटेल व्यावसायिक अरुण बाजीराव कापसे याला ताब्यात घेतले होते. मात्र, सक्षम पुराव्याअभावी त्याची लगेच सुटका झाली. या प्रकरणात अंधारी ग्रामस्थांसह त्या परिसरातील २२ संघटना आक्रमक झाल्याने पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान करत सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलचे सीडीआर चेक करत प्रथम संशयित रामचंद्र तुकाराम दुबळे याला दि. १६ ला अटक केली असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत असताना रामचंद्र याने संजय शेलारचा खून अरुण बाजीराव कापसे याच्या सांगण्यावरून केला असल्याबाबतची कबुली दिली.
तसेच या खुनाच्या कटात विकास अवधूत सावंत याचाही सहभाग असल्याची कबुली रामचंद्र दुबळे याने दिली होती. त्यामुळे विकास सावंत याला सुद्धा पोलिसांनी ता.१८ ला अटक केली होती. मात्र, यातील मुख्य संशयित अरुण कापसे हा हे प्रकरण घडल्यानंतर फरार झाला होता. त्याचा तपास घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. पोलिसांनी कापसे याचा शोध विविध ठिकाणी घेत त्याला मिरज येथून बुधवारी (ता. २२) अटक केली. दरम्यान, कापसे याला न्यायालयात हजर केले असता त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य संशयितास अरुण कापसे याला पळून जाण्यासाठी मदत करणारा अजिंक्य विजय गवळी तसेच लपवून ठेवणारा प्रशांत मधुकर शिंत्रे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या खून प्रकरणाचा उलगडा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मेढा पोलिस, वाई पोलिसांनी केला आहे. या कारवाईत सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अमोल गवळी, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पांगारे, सुधीर वाळुंज यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, मेढा व वाई पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत