कराड प्रतिनिधी | कराड येथील गांधी फाउंडेशन व कराड नगरपरिषद तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने शहरामध्ये ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल) संकलन अभियान रविवार, दि. २६ जानेवरी रोजी आयोजित केले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शहरात ३० संकलन केंद्रामध्ये हा ई-कचरा संकलित करण्यात येणार आहे. याची जनजागृती करण्यासाठी गुरुवारी, दि. २३ जानेवारी रोजी शहरात दुपारी ४ ते ६ या वेळेत भव्य प्रबोधन रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड येथे गांधी फाउंडेशनच्या वतीने ई-कचरा संकलन उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिष घेण्यात आली. यावेळी एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, अॅड. संभाजीराव मोहिते, डॉ. मिहीर वाचासुंदर, नगरपालिका आरोग्य निरीक्षक देवानंद जगताप, शासकीय अभियंता महाविद्यालयाचे अळसुंद, नगरपालिकेचे माजी अभियंता ए. आर. पवार, पूर्ण इको व्हिजनचे अमोल सोडक उपस्थित होते.
यावेळी धीरज गांधी म्हणाले, ई-कचरा शरीरास अत्यंत धोकादायक असतो. याचे दुष्परिणाम माहीत नसल्याने अनेक आजारांना त्यामुळे निमंत्रण मिळत आहे. . नागरिकांमध्ये याबाबतची जनजागृती करणे व ई-कचरा घराबाहेर काढणे यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि. २६ जानेवारी रोजी शहरातील प्रत्येक पेठेमध्ये एकूण ३० ई-कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येणार असून या संकलन केंद्रामध्ये हा कचरा गोळा करण्यात येणार आहे. पुणे येथील पूर्णम कंपनीकडे हा कचरा देण्यात येणार असून याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.