कराड प्रतिनिधी | कराड चिपळूण महामार्गावर असणाऱ्या कुंभार्ली घाटात गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक अलोरे शिरगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री पकडला. याप्रकरणी अलोरे – शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
चालक शहाजी शंकर नलवडे ( वय ५२ वर्ष रा – जखीनवाडी कृष्णा हाँस्पीटल शेजारी ता. कराड, जिल्हा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाट मार्गे एक वाहन अवैध गुरांची वाहतूक करणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने तेथील पोलीस अंमलदार यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली. त्या दरम्यान एक अशोक लेलंड ट्रक क्रमांक MH-50-4480 हा चिपळूण ते कराड कडे जात असताना त्याचा संशय आल्याने वाहनाला थांबवून त्यामधील चालकाकडे चौकशी करण्यात आली.
त्यानंतर गाडीच्या हौद्यामध्ये पाहिले असता हौद्या मधून दाटी वाटीने व आखुड दोरीने बांधून ठेवलेली एकूण २२ जनावरे भरलेली आढळून आली. या जनावरांचा जागीच दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे. तसेच आलोरे पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 03/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण 1976 चे कलम 5 (ए) (1),9 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (घ), (ङ), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 व मो. वा.का. कलम 66 / 192 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व गुन्ह्यामधील वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
या गुन्ह्यामधील चालक शहाजी शंकर नलवडे ( वय ५२ वर्ष रा – जखीनवाडी कृष्णा हाँस्पीटल शेजारी ता. कराड, जिल्हा. सातारा ) यास अटक करण्यात आलेली आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे. या संशयित आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता केले असता १ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे व इतर ३ आरोपींचा शोध सुरु असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.