जखमी बिबट्याचा वन अधिकाऱ्यासह कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला

0
264
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरालगत असणार्‍या खिंडवाडी परिसरातील सोनगाव तर्फ सातारच्या जंगलात जखमी बिबट्याने रेस्क्यूसाठी गेलेल्या वन अधिकारी व कर्मचार्‍यांवर अचानक हल्ला केला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

या हल्ल्यात सातार्‍याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्यासह सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या जखमी बिबट्याला पुण्याच्या रेस्क्यू टीमने दुपारी बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन देऊन पकडले.

जखमींमध्ये सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, परळीचे वनरक्षक सुहास काकडे, वनरक्षक भूषण गावंडे या वन कर्मचार्‍यांसह प्राणी मित्र महेश अडागळे (रा. मानेवाडी, ता. सातारा), सचिन कांबळे (रा. सातारा), मयूर अडागळे (रा. सातारा) यांचा समावेश आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, पुणे-बेंगलोर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री रस्ता ओलांडणारा बिबट्या एका वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. हा बिबट्या सरकत-सरकत रस्त्याकडेला असलेल्या दाट गवतात जाऊन थांबला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण हे वन कर्मचारी, पोलिस कर्मचारी, प्राणी मित्रांना घेऊन घटनास्थळी गेले. तसेच पुणे येथील रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार पहाटे तीनच्या सुमारास पुण्याची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने अंधारात जखमी बिबट्याचा शोध घेतला. दाट झाडी व गवत असल्याने बिबट्या दिसून आला नाही. ही संपूर्ण टीम या ठिकाणी सोमवारी रात्रभर थांबून होती.

मंगळवारी सकाळपासूनच बिबट्याच्या शोधासाठी पुन्हा मोहीम राबवण्यात आली. सकाळी 11.30 च्या सुमारास महामार्गालगत असलेल्या सोनगाव हद्दीत बिबट्याचा शोध घेतला जात असतानाच या जखमी बिबट्याने अचानक डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्यावर हल्ला केला. मात्र, डॉ. चव्हाण यांनी चपळपणे हालचाल करून ते बाजूला झाले. त्यामुळे बिबट्याला त्यांचा चावा घेता आला नाही. मात्र, बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात ते पडले. यात त्यांच्या हाताला मार लागला.

बिबट्याने पुन्हा मागे फिरत महेश अडागळे यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या पायाचा चावा घेतला. पुन्हा इतरांवरही बिबट्याने हल्ला चढवला. बिबटयाच्या या आक्रमकपणामुळे एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पळालेले इतर सर्वजण बाजूच्या खड्ड्यात पडले. त्यामुळे तेही जखमी झाले. यानंतर हा बिबट्या पुन्हा दाट झाडीत दडून बसला. यानंतर सोबत असलेल्या अन्य वन कर्मचारी, पोलिस व प्राणी मित्रांनी प्रसंगावधान राखत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.