कराड प्रतिनिधी | चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून तब्बल साठ हजार रुपये किमतीच्या दीड हजार दारूच्या बाटल्या लंपास केल्याची घटना कराड तालुक्यातील विरवडे-ओगलेवाडी येथे सोमवारी उघडकीस आली.
याबाबत माधव हनुमंत जाधव यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील हजारमाची येथे राहणारे माधव जाधव हे विरवडे-ओगलेवाडी गावच्या हद्दीत असलेले देशी दारूचे दुकान चालवितात.
रविवारी दिवसभर दारू विक्री केल्यानंतर त्यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर सोमवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता तेथील सुरक्षारक्षक सदाशिव कदम यांनी दारू दुकानाच्या दरवाजाची कडी कोयंडा अज्ञाताने तोडला असल्याचे माधव जाधव यांना सांगितले. त्यामुळे माधव जाधव यांनी दुकान उघडून आत पाहिले असता दुकानातील देशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स विस्कटलेले दिसले.
तसेच काही बॉक्स रिकामे होते. त्यांनी परिसरात पाहिले असता त्यांना कोठेही दारूच्या बाटल्या दिसून आल्या नाहीत. चोरट्यांनी देशी दारूच्या ५८ हजार ९५५ रुपये किमतीच्या सुमारे दीड हजार बाटल्या चोरून नेल्याचे माधव जाधव यांच्या निदर्शनास आले. याबाबत कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.