पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाला म्हसवड पोलीसांनी ठोकल्या बेड्या; साथीदार मात्र अद्यापही फरार

0
19

सातारा प्रतिनिधी | म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील देवापूर येथील कांता बनसोडे या सेवानिवृत्त आरोग्य सेवकास जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पाडुन रक्कम दहापट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणुक करणारा भोंदूबाबा मंगेश गौतम भागवत (वय ३२, रा. कळस, ता. इंदापूर) याला म्हसवड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मदत करणारा त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे अद्यापही फरारी आहे. भागवत यास न्यायालयाने उद्या २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

म्हसवड पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की कांता वामन बनसोडे आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झाल्याची माहिती म्हसवड येथील सर्जेराव वाघमारे यांना समजले. सेवानिवृत्तीनंतर बनसोडे यांना मिळालेले पैसे दहापट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांना वाघमारे यांनी भोंदूबाबाच्या घरी नेले. भोंदूबाबा मंगेश भागवत याने त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून गोल रिंगणात बसवले व मंत्रोच्चार करीत त्यांच्या हातात एक बॉक्स दिला. हा बॉक्स २१ दिवसांनी घरी जाऊन हळदी कुंकू लावून उघडण्यास सांगितले. त्यापूर्वी कांता बनसोडे यांच्याकडुन या भोंदूबाबाने ३६ लाख रुपये घेतले. दिलेल्या बॉक्समधील रक्कम दहापट म्हणजे ३६ कोटी रुपये होतील असे सांगितले. त्यानंतर कांता बनसोडे तो बॉक्स घेऊन घरी आले. बॉक्स त्यांनी घरातील देव्हाऱ्यासमोर ठेवला.

२१ दिवसानंतर त्यांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये पेपर कात्रणे केलेली रद्दी आढळली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी सर्जेराव वाघमारे याला सांगितले. त्यावेळी तुमचे ग्रहमान ठीक नाही, पुन्हा मंत्रोपच्चार करुन देतो, असे मंगेश भागवतने सांगितल्यावर कांता बनसोडे यांनी त्यास नकार देत आपले पैसे परत मागितले. त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यावर कांता बनसोडे यांनी दि. ४ जानेवारी रोजी भोंदूबाबा व त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे या दोघांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांना ही माहिती दिली. शेंडगे यांनी देवापूर येथील बनसोडे यांच्या घरी भेट देत तपासाच्या सूचना बिराजदार यांना दिल्या. पोलीसांनी भोंदूबाबा मंगेश गौतम भागवत याला त्याच्या घरातुन दि. १६ रोजी अटक केली. भागवत यास न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्जेराव वाघमारे फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, दहिवडीचे घनशाम सोनवणे यांचे सहकार्य लाभले. बिराजदार उपनिरीक्षक अनिल वाघमाेडे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमाेडे, संतोष जाधव, संतोष काळे यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.