प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली साताऱ्यातील महत्वाच्या ठिकाणी भेट

0
133

सातारा प्रतिनिधी | पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुट्टीच्या दिवशी रविवारी सातारा शहरातील महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी युद्ध स्मारक, पोवई नाका शिवसृष्टी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील उड्डाण पूल आणि अजिंक्यतारा परिसरास भेट देऊन पाहणी केली. तसेच या संदर्भात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली.

दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शाहू स्टेडियम, शहरातील रस्ते त्यांची स्वच्छता व विद्युत रोषणाई संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सूचना दिल्या. अजिंक्यतारा किल्ला परिसराची देखील पाहणी जिल्हाधिकारी पाटील यांनी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी पाटील यांच्यासमवेत पालकमंत्री यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे, रविराज जाधव देखील उपस्थित होते.