कराड प्रतिनिधी | पहाटेच्या वेळी दरोडा टाकून तीन घरे फोडून सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना कराड तालुक्यातील माळवाडी येथे रविवारी घडली. यावेळी तीन बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य करत घरांचे मुख्य लाकडी दरवाजाचे कुलूप, कोयंडे फोडले. एका घरातून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा एक तोळे सोन्याची दोन ग्रॅमची चेन लंपास केली. उर्वरित दोन घरांत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती की, माळवाडी येथील प्रमोद विजयकुमार देसाई हे मुंबई येथे राहतात. ते कालच मुंबईवरून आले होते. ते त्यांच्या भावाच्या घरी राहिले होते. आज सकाळी ते घराची साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा फोडलेला दिसला. शेजारील लीला संपत जाधव व प्रमिला मधुकर घाडगे यांच्या घराचेही मुख्य दरवाजे फोडलेले दिसून आले.
त्यात माळवाडी येथील लीला जाधव या घर बंद ठेवून गोव्याला राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची दोन ग्रॅम वजनाची चेन चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. जाधव यांच्या घराशेजारील प्रमिला घाडगे व प्रमोद देसाई (दोघेही रा. मुंबई) त्यांच्याही घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून साहित्य विस्कटले आहे. तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
लीला जाधव यांच्या कन्या सुजाता विक्रमसिंह पोळ (रा. यशवंतनगर) यांनी येथील पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात करत आहेत.