सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर; मतदार यादीवर 27 पर्यंत हरकतींची मुदत

0
105

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २७ जानेवारीपर्यंत मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तीन फेब्रुवारीला हरकतींवर निर्णय घेण्यात येऊन, सात फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

कराड उत्तरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. विधानसभेनंतर सह्याद्री कारखान्याची निवडणूक चर्चेत आहे. सह्याद्री कारखान्यातील सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीसाठीची कार्यवाही सुरू केली आहे. विरोधकांनीही या वेळी निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार कारखान्याची प्राथमिक मतदार यादी आठ फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे कळवले आहे.

त्यासाठी संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी पुण्याच्या साखर संकुलातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराड उपनिबंधक कार्यालय, कडेगाव येथील सहायक निबंधक कार्यालय, कऱ्हाड तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यास व तपासणीसाठी लावली आहे. कारखान्याच्या मतदार असणाऱ्या कोणत्याही सभासद किंवा संस्थेच्या वतीने मतदान करण्यास प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलासंबंधातील कोणतीही चूक कळवता येईल. संबंधितांनी त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची नोंद करून स्वतंत्ररीत्या लेखी स्वरूपात पुराव्यासह आपल्या हरकती प्रादेशिक साखर सहसंचालक पुणे, विभाग पुणे यांच्या कार्यालयात २७ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करायच्या आहेत.

त्या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचेही कार्यालयाने कळविलेले आहे. मुदतीत आलेल्या हरकतींवर तीन फेब्रुवारीला निर्णय घेण्यात येईल. सात फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अधिसूचनेत म्हंटले आहे.