सातारा प्रतिनिधी । राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु केला आहे. मंत्रालयात बांधकाम खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी आज प्रादेशिक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने स्वतः लक्ष घालावे. प्रस्तावित विकासकामे करण्यासाठी. पुढील १०० दिवसांचा नियोजन आराखडा तयार करून नियोजनबद्ध रोड मॅप तयार करा आणि त्यानुसार कामकाज करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पणन विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पर्यटन विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालय या विभागांचा १०० दिवसांचा नियोजन आराखडा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रादेशिक आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे आणि पुढे करावयाची प्रस्तावित कामे याचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव एस. डी. देशपुते यांच्यासह विभागाचे मुख्य अभियंता व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री भोसले यांनी राज्यातील सर्व जिल्हानिहाय सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व इतर सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर याठिकाणी नव्याने छ. शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कामासंदर्भातही मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.