कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयच्या रोजगार मेळाव्यात 600 पेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे

0
3

कराड प्रतिनिधी | कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात विविध पदविका, पदवी, आय. टीआय. बी. कॉम, बी.एस.सी, बी. फार्मसी. अशा क्षेत्रातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्त करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे उपसंचालक एन. एन. वाडोदे, डॉ. सुहास देशमुख, डॉ. विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले.

योग्य व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, बांधकाम, उर्जा, पर्यटन व इतर क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त कंपन्यांनी व ३०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी संस्थेला भेट दिली. या मेळाव्यात ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही, मेळावा निर्दोषपणे सूक्ष्म स्तरीय नियोजनासह आयोजित करण्यात आला.

मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमधील उत्कृष्ट सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि आश्वासक वातावरणाचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. या रोजगार मेळाव्याला यशस्त्री करण्यासाठी विविध संस्थांनी, माध्यमातील सर्व सदस्य तसेच आस्थापनांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले.