कराड प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी परवान्याची गरज असते; मात्र बहुतांशजणांना त्याबाबत काहीही माहिती नसते. त्यामुळे परवाना असो अथवा नसो, अनेकजण मद्यप्राशन करताना आढळून येतात. मद्यप्राशन करणाऱ्यांना परवाना आहे की नाही, हे कोणी पार पाडत नाही. त्यामुळे दारू पिण्याचा परवाना काढण्याबाबत कोणीही गंभीर नसल्याचे दिसते. मात्र, दारू पिऊन कोणी गाडी चालताना आढळल्यास संबंधीतावर पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई देखील केली जाते. पण खरं संगायच झालं तर मद्यपान हे अपायकारकच आहे.
कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री किंवा सेवन करण्यासाठी त्याला परवान्याची गरज असते. मद्यसेवन करण्याच्या परवान्यानुसार तुम्हाला दारू पिण्याची क्षमता ठरवून दिलेली असते. मद्य खरेदी करताना तुम्हाला तुमच्याकडे असलेले लायसन्स दुकानात दाखविणे गरजेचे असते. मात्र, मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो.
मद्यसेवनाचा परवाना काढणे म्हणजे स्वतःची प्रतिमा मलीन होणे, असे गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकजण हा परवाना न काढताच मद्यपान करताना दिसतात. मात्र, नागरिकांचा संकोच लक्षात घेता सरकारने गेल्या २०१७ पासून मद्यसेवनाचा परवाना ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा परवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचा देखील असू शकतो. हा परवाना मिळविण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते. शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेला तर, परवाना दिला जातो.
परवाना कसा आणि कोठे काढला जातो?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर विविध सुविधांची यादी दिलेली असते. त्यामध्ये मद्य पिण्याच्या परवान्याचा पर्याय असतो. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागतो. उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याठिकाणी सर्विसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा., अशा प्रकारे परवाना काढला जातो.
काय आहेत मद्यपान करण्याचे नियम?
मद्यपान करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळते. मात्र, त्यालाही काही निर्बंध आहेत. ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहल असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी वयाची २१ वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे.
‘इतके’ आकारले जाते शुल्क?
कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. तसेच एका दिवस देशी दारू पिण्याच्या परवान्यासाठी २, तर विदेशी दारू पिण्यासाठी ५ रुपये आकारले जातात.
पनवान्यासाठी लागणारी कागदपत्रे
ऑनलाइन अर्जासाठी डिजिटल फोटो, सही, ओळखपत्र त्यामध्ये आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र, तसेच रहिवासी दाखला आदी कागदपत्रांची परवाना काढण्यासाठी गरज असते.
बारमध्ये मद्यपानासाठी परवाना लागत नाही का?
माइल्ड बियर पिण्यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. इतर दारूसाठी २५ किंवा त्यापेक्षा अधिक वय गरजेचे असते; तसेच बारमध्ये मद्यपान करण्यासाठीही परवान्याची गरज असते. हा परवाना विक्रेत्याकडेच मिळतो.
उल्लंघनासाठी दंड
परवान्याशिवाय महाराष्ट्रात दारू बाळगताना, सेवन करताना किंवा वाहतूक करताना पकडलेत्यावर कारवाई केली जाते. त्यावेळी संबंधिताकडून 50,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो किंवा महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अन्वये पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
दारू पिऊन गाडी चालवल्यास…
Motor Vehicle Act 2019 नुसार मद्यपान करून वाहन चालवणे बेकायदेशीर असून हा फौजदारी गुन्हा आहे. ब्रेथ अॅनलायझरवर अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम / 100 मिली पेक्षा जास्त दिसल्यास ‘drunk driving’ समजले जाते. यासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा हा गुन्हा घडल्यास ही शिक्षा 2 वर्षे तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड अशी आहे.