सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात 17 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद मैदानावर उमेद महिला बचत गटाच्या मिनी सरस मानिनी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन असणार आहे, ज्यामुळे सातारकरांना अस्सल गावरान चवीची खाद्य मेजवानीबरोबरच मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. या जत्रेत एकूण 125 स्टॉल असणार आहेत, ज्यात 100 स्टॉल बचत गटांच्या विशेष वस्तूंसाठी व 25 स्टॉल खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माहिती दिली की, या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 जानेवारीला दुपारी बारा वाजता ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद जाधव-पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, धैर्यशील मोहिते- पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख व सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
नागराजन म्हणाल्या, “महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षाच्या सूचनेनुसार सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत मिनी सरस मानिनी जत्रा आयोजित करण्यात आली आहे.”
प्रकल्प संचालक विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे म्हणाले, “साताऱ्याचा एवन बासुंदी चहा, महाबळेश्वरची जामजेली स्ट्रॉबेरी मध, पाटणची लाकडी खेळणी, जावळीचा हातसडी तांदूळ, माणचे जैन घोंगडी, वाईची हळद मसाले टेडी, कऱ्हाडचा नैसर्गिक गूळ पौष्टिक कुळीथ सूप, फलटणचे खणाचे ड्रेस, कोरेगावचे पंचगव्य प्रोडक्स खंडाळाचे कडधान्य लाकडी तेल घाणा तेल आणि खटावची मातीची भांडी हा बचत गट उत्पादित माल या विक्रीस उपलब्ध असणार आहे.”