कराड – पाटण तालुक्याच्या सीमेवर वानरवाडीतील मोबाइल टॉवर बंद

0
10

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वानरवाडी येथे सुरू करण्यात आलेला बीएसएनएल मोबाइल टॉवर गेल्या वीस दिवसांपासून बंद आहे. परिणामी मोबाइलला नेटवर्क नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित विभागाकडून यांची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दैनंदिन जीवनात मोबाइल हा प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा घटक झाला आहे. एक दुसऱ्याशी फक्त संपर्काव्यतिरिक्त आर्थिक व्यवहार ते शासकीय कामकाजासाठी मोबाइलचा वापर केला जात आहे.

डिजिटल भारत घडविण्यासाठी पंतप्रधानांनी म्हणे चंग बांधला आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या मोबाइल रेंजच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही ठिकाणी मोबाइल टॉवर असतानाही भोंगळ नियोजनाअभावी बंद अवस्थेत असल्याने अनेक धारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कऱ्हाड-पाटण तालुक्याच्या सीमेवर डोंगरी भागात वसलेले वानरवाडी गाव आहे. याठिकाणी मोबाइलला नेटवर्क नसल्याने मोबाइल सेवा मिळत नव्हती. मोबाइलला नेटवर्क मिळावे, म्हणून शासकीय कार्यालयात पाठपुरावा करून बीएसएनएल कंपनीचा टॉवर सुरू करण्यात आला.

सुरू करून वर्षे उलटून गेली. मात्र आजमितीस एक महिनाही टॉवर सुरळीत चालू नाही. दहा दिवस चालू, तर वीस दिवस बंद, अशी अवस्था झाली आहे. परिणामी महिन्यांसाठी मारलेला बॅलेन्स नेटवर्कअभावी वाया जात आहे, तर अन्य कोणत्याही कंपनीच्या मोबाइल कार्डला नेटवर्क नसल्याने या ‘बीएसएनएल’च्या नॉट रिचेबल टॉवरला महत्त्व आले आहे. मोबाइला रेंजच येत नसल्याने ग्राहकांत नाराजीचे सूर आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.