पुणे डीआरएम राजेश कुमार वर्मा यांची लोणंद जंक्शनला भेट; नूतनीकरण कामांचा आढावा

0
7

सातारा प्रतिनिधी | पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी नुकतीच लोणंद जंक्शनवरील नूतनीकरण कामांचा आढावा घेतला. काल बुधवार दि. १५ रोजी सकाळी भेट देत त्यांनी येत्या मार्चअखेरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, ठेकेदार आणि अभियंते उपस्थित होते.

राजेश कुमार वर्मा यांनी आठ दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे विभाग व्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर लोणंद जंक्शनवरील कामांची पाहणी करण्यासाठी ते प्रथमच लोणंदला काल आले होते. यावेळी लोणंद येथील प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन लोणंद जंक्शनवर सुपरफास्ट गाड्या थांबविण्यात याव्यात, स्थानकावरील समस्या, विद्यार्थ्यांसाठी स्काय वॉक आणि प्लॅटफॉर्मवर स्वयंचलित जिना बसविण्याची मागणी केली.

सातारा-पुणे डेमो प्रवासी संघटनेच्या वतीने सकाळची डेमो १० च्या आत पुणे स्टेशनला पोहोचविण्याची विनंती करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, सातारा-पुणे डेमोने शासकीय निमशासकीय कर्मचारी, कॉलेजला जाणारे विद्यार्थी दररोज या गाडीने प्रवास करतात. मात्र, ही गाडी साडेदहा वाजता पुणे स्टेशनला पोहोचल्याने नोकरदार वर्गाला कामावर वेळेवर जाता येत नसल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे. यासाठी हीच गाडी साताराहून सहा वाजता निघाल्यास साडे नऊपर्यत पुणे स्टेशनला पोहोचू शकेल.

पूर्वी ही गाडी साडेसहाला साताऱ्यातून सुटत असे, मात्र १ जानेवारीपासून ती ६:५० निघत आहे. हीच गाडी साताऱ्यातून सहा वाजता निघाल्यास आणि गाडी पिंपरी चिंचवड किंवा तळेगावपर्यंत नेल्यास पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म उपलब्धतेचा प्रश्नही मार्गी लागेल आणि प्रवासी दहाच्या आत पुणे स्टेशनवर पोहोचू शकतात आणि हीच गाडी पुन्हा कोल्हापूरकडेही वेळेवर जाऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.