सातारा प्रतिनिधी । वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील स्वयंसेवकांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिनाच्या निमित्ताने, वाई पोलिस ठाण्यास भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी विविध शस्त्रांची माहिती घेतली आणि पोलिस कार्याच्या विविध पैलूवर प्रकाश पाडला.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅप्टन डॉ. समीर पवार यांच्या सहकार्याने, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. पोलीस कर्मचारी मंगेश जाधव यांनी स्वयंसेवकांना शस्त्रांच्या विविध प्रकारांबद्दल मौलिक माहिती दिली. चित्रपटांमधून प्रसिद्ध असलेल्या बंदुकीपासून रायफलपर्यंतचे गैरसमज दूर करण्यात त्यांनी यश मिळवले.
बंदुकीच्या गोळ्या, दारूगोळा, बेडी, बॉंब यांची तपशीलवार माहिती देताना, त्यांनी रायफल कशी हाताळली जाते व शस्त्रांची कार्यक्षमता यांचे प्रात्यक्षिक दाखवले. मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणांनी पोलिसांच्या शौर्याची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील ताज हॉटेल वरील दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी दाखविलेला पराक्रम आणि त्यावेळी त्यांनी स्वतः गाजविलेले शौर्य त्यांनी अभिमानाने सांगितले. पोलीस हाही एक माणूसच आहे, त्याला समाजाच्या सहकार्याची गरज असते, असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली, ज्यामुळे स्वयंसेवकांना पोलीस कार्याबद्दल खोलात जाऊन समजून घेण्याची संधी मिळाली.