औंधच्या श्री यमाई देवीचा रथोत्सव उत्साही वातावरणात साजरा

0
9

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथे श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मंगळवारी उत्साही वातावरणात साजरा झाला. या दिवसाला औंधच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे, कारण या रथोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. या रथोत्सवाची सुरुवात दुपारी सव्वाबारा वाजता श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये षोडषोपचारे पूजनाने झाली.

गायत्रीदेवी यांनी देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणली आणि त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे, हेमंत हिंगे, पुजारी बांधव यांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. देवीची पालखी चौपाळयाजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आला, जिथे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन डराया सेठना यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. गायत्रीदेवी यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.

‘आई उदे गं अंबे उदे’च्या जयघोषाने औंधनगरी दुमदुमून गेली. या रथोत्सवात 6 तास देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली, जी चावडी चौक, मारूती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळयावर नेण्यात आली. सायंकाळी उशीरा पद्माळे तळयामध्ये देवीस अभिषेक करून पंचोपचारे पूजन करण्यात आले.

या उत्सवात डराया सेठना, भूमी इराणी, मुस्तफा पाटणकर, स्वाती अरींगळे, ऋषभ ओसवाल, ऋषिकेश बोबडे, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, जितेंद्र पवार, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार बाई माने, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, शाकिर आतार, शंकरराव खैरमोडे, अब्बास आत्तार, प्रशांत खैरमोडे, दिपक नलवडे, गणेश देशमुख, अमर देशमुख, उपअभियंता संजय खोत, शशिकांत मोरे, नवल थोरात, यशवंत देशमुख, रमेश चव्हाण, प्रदीप कणसे, संजय निकम, दिपक कर्पे, गणेश चव्हाण, संतोष भोसले, धनाजी आमले, शैलेश मिठारी इलियास पटवेकरी, सपोनि अविनाश मते यांच्यासह भाविक उपस्थित होते. रथासमोर वाद्यवृंद पथके, लेझीम, बँड पथके सहभागी झाली होती.