सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात फसवणूकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी या कारखान्यात एक गंभीर आर्थिक फसवणूक झाली आहे दि. ४ डिसेंबर २०२४ ते दि. १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत, कारखान्याच्या वजनकाट्यावर एकाच ऊस ट्रॉलीचे दोनदा वजन करून १०२.१६७ मे. टन ऊस न घालता तो घातल्याच्या नोंदी करण्यात आल्या. या फसवणूकीमुळे कारखान्याला एकूण ४ लाख २५ हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात शेतकर्यासह वाहनचालक, वाहनमालक अशा ९ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्यातर्फे सदानंद रघुनाथ पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. तपासणी आणि पडताळणीमुळे उघड झालेल्या अभिलेखांनुसार, या सर्वजणांनी आपसात संगनमत करून दिशाभूल व फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस निरीक्षक एस. डी. महाडिक यांनी या प्रकरणाची अधिक तपास सुरू केली आहे. कारखान्याच्या आर्थिक फायद्याच्या निमित्ताने घडलेल्या या फसवणुकीच्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.