दहिवडीत 15 हजारांची लाच घेताना अभियंत्यासह ठेकेदारास रंगेहाथ पकडले

0
5

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. दरम्यान, जिल्हयातील माण तालुक्यात अशीच एक घटना घडली असून माण तालुक्यातील उकिर्डे येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे केलेल्या बांधकामाचे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना दहिवडी येथील बांधकाम विभागाचा शाखा अभियंता व खासगी ठेकेदाराला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजता दहिवडी येथे करण्यात आली.

दहिवडी बांधकाम विभागाचा शाखा अभियंता भरत संभाजी जाधव (वय ५४, रा. डबरमळा, दहिवडी, ता. माण), खासगी व सरकारी ठेकेदार बुवासाहेब जयराम जगदाळे (६१, रा. बिदाल, ता. माण), अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी उकिर्डे, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे बांधकाम केले होते. हे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी शाखा अभियंता भरत जाधव याने तक्रारदाराकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोमवारी दहिवडी येथे सापळा लावला. त्यावेळी ठेकेदार बुवासाहेब जगदाळे याच्यामार्फत भरत जाधव याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजापुरे, गणेश ताटे यांनी ही कारवाई केली.