ऐतिहासिक वाघनखे ‘या’ दिवशी घेणार सातारा जिल्ह्याचा निरोप

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे (Tiger Claws) राजधानी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) ठेवण्यात आली आहेत. ही ऐतिहासिक वाघनखे लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत. दि. ३१ जानेवारीपर्यंत ही वाघनखे शिवप्रेमींना पाहता येणार असून, यानंतर ती नागपूर येथील संग्रहालयात विसावा घेणार आहेत.

लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दि. १९ जुलै रोजी दाखल झाली. दि. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच संग्रहालयातील शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले. प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली.

संग्रहालयात वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, भाले, तलावारी, कट्यार, चिलखत, बंदुका, चांदी व सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत. या वाघनखांचा संग्रहालयातील कालावधी दि. ३१ जानेवारीला पूर्ण होत असून, यानंतर ही वाघनखे नागपूर येथील संग्रहालयाकडे सुपुर्द केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आणखी १७ दिवस वाघनखे संग्रहालयात पाहता येणार आहेत.

वाघनखांची कथा काय?

छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.