कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील पाल येथील श्री. खंडोबादेवाची यात्रा पार पडली. यात्रा करून घरी परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका भाविकाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अविनाश आनंदा लोंढे (वय ३०, रा. बाजार भोगाव, ‘ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश लोंढे हे दुचाकी (क्रमांक एम एच ०९ एफ एन ५५०४) वरून शनिवारी पाली यात्रेसाठी गेले होते. पालीची यात्रा आटोपून ते रविवारी परत घरी पन्हाळा येथे जात होते. आशियाई महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत आले असता भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीची दुभाजकाला धडक झाली. त्यानंतर दुचाकी महामार्गाकडेला असलेल्या खड्ड्यात पडली तर लोंढे हे महामार्गावर फेकले गेले.
त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्राव झाला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. अपघात होताच आसपासच्या ग्रामस्थांसह वाहनधारकांनी अपघातस्थळी धाव घेतली, मात्र लोंढे हे बेशुद्ध अवस्थेत पडल्यामुळे वाहनधारकांनी महामार्ग पोलिसांना खबर दिली. महामार्ग पोलीस व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दुचाकी क्रेनच्या साह्याने खड्यातून बाहेर काढण्यात आली. अविनाश हा खासगी फायनास कंपनीत कामाला असल्यामुळे मुलगी व पत्नीसह कोल्हापुरात राहत होता. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.