सातारा प्रतिनिधी | मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकतीच महाबळेश्र्वर तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व विभागांनी विकासकामांसाठी परस्परांमध्ये समन्वय राखून गती द्या. एकमेकांच्या कामात अडथळे आणणे बंद करा, अशी तंबी मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी मुख्य बाजारपेठ सुशोभीकरण, पार्सनेज मार्केट इमारत तसेच पालिका इमारत प्रस्तावासह विकासकामांची माहिती दिली. ना. मकरंद पाटील यांनी बाजारपेठ सुशोभीकरण कामाबद्दल नाराजी व्यक्त करून व्यापार्यांसमवेत चर्चा करून नवीन आराखड्याच्या कामास गती देण्याच्या सूचना प्रशासक पाटील यांना दिल्या. पालिका इमारतीचे गेली काही वर्षे रखडलेले काम देखील पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासक पाटील यांना सांगितले तसेच पार्सनेज मार्केट मधील वाहनतळ व शॉपिंग कॉम्प्लेक्स कामासह इमारत कामासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून हे काम पालिकेने प्राधान्याने हाती घ्यावे असे सांगितले.
शहरातील विकास कामांच्या बाबत महत्वपूर्ण चर्चेमध्ये विशाल तोष्णीवाल, अॅड. संजय जंगम, अफझल सुतार, रवींद्र कुंभारदरे आदींनी आपली मते मांडली पाचगणी पालिकेच्या विकास कामांची सविस्तर माहिती पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. यावेळी पाचगणीच्या दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरकडे येणार्या पर्यटकांच्या लुटीकडे पदाधिकार्यांनी लक्ष वेधले याबाबत बोलताना ना. पाटील यांनी प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन लूट होणार नाही अशा पद्धतीने ठेकेदारास समज देण्याच्या सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी तालुक्यात सुरु असलेल्या रस्ते कामांची -माहिती दिली. ना. पाटील यांनी हॅम्प मधून होणार्या कामाची देखील माहिती घेतली महाबळेश्वर तालुक्यात देखील मेढा रस्त्याप्रमाणेच दर्जेदार कामे करण्यासाठी प्रयत्न करा. अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य विजय नायडू, डी. एम. बावळेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस सहा उपवनसंरक्षक प्रदीप रौंदळ, गटविकास अधिकारी यशवंत भांड, बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, महावितरणचे चेन्ना रेड्डी, आगर व्यवस्थापक महेश जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीस बाबुराव संकपाळ, बबनराव ढेबे, विमलताई पार्टे, अॅड. संजय जंगम, संदीप साळुंके, विशाल तोष्णीवाल, सुनील शिंदे, नासिर मुलाणी, रोहित ढेबे, शरद बावळेकर, दत्तात्रय वाडकर, रवींद्र कुंभारदरे, जीवन महाबळेश्वरकर, श्रद्धा रोकडे, सुरेखा देवकर, लता आरडे, तौफिक पटवेकर, अनिकेत रिंगे, सचिन ढेबे आदि उपस्थित होते.