सातारा प्रतिनिधी । “पैशांचा पाऊस पाडून गुप्तधन काढून देतो,” असे सांगून सामान्य लोकांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या भोंदू बाबाला तातडीने अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी नुकताच संवाद साधला. यावेळी दाभोळकर म्हणाले की, माण तालुक्यातील कांता बनसोडे यांच्या तक्रारीनुसार मांत्रिक मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अजून मांत्रिकांना अटक झालेली नाही. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हे मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे असा संशय आहे.
संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भूलथापा देऊन काही मांत्रिक लोकांना लाखोंचा गंडा घालत आहे. विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हात चलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. पैशाचा पाऊस ही अंधश्रद्धा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा मार्फत केले आहे.
म्हैसाळ येथे अशीच फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मांत्रिकाने विष देऊन संपवले होते. या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळ सारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादूटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा, अशी मागणी करत असल्याचे दाभोलकर यांनी म्हटले आहे.