खंडोबा-म्हाळसा यात्रेसाठी पाल सज्ज; यात्रेचा उद्या मुख्य दिवस

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र देश राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे.

पाल देवस्थान ट्रस्टने काशीळ- हरपळवाडी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण केले आहे. उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी मेवा, मिठाईची दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभे राहिले आहेत. यात्रेतील भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर उभारले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात व लग्न सोहळा मंडपात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

काशीळ-पाल मुख्य रस्त्यालगत मेवामिठाई, खेळणी व छोटी हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. पालनगरी हळूहळू फुलू लागली आहे. एसटी प्रशासनाने काशीळ-पाल रस्त्यावर आदर्शनगर येथे तात्पुरत्या बसस्थानकाची तयारी केली आहे.

लांब पल्यावरून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती तसेच, सर्व शासकीय विभागाने त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. अनुचित घटना घडल्यास जयवंत शुगर, सह्याद्री कारखाना, अजिंक्यतारा कारखाना आणि कऱ्हाड पालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.