राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटलांनी दिली महत्वाची माहिती

0
5

सातारा प्रतिनिधी | नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत मदतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च २०२३ पासून ९ हजार ३०७ कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावना ना. मकरंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार 376 रुपये मदत

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८७ लाख १६ हजार ९४ रुपये, सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार १३ शेतकऱ्यांना ४ कोटी २५ लाख ४ हजार २८७ रुपये, सांगली जिल्ह्यातील ५२२ शेतकऱ्यांना ५२ लाख १२ हजार ८०३ रुपये, पुणे जिल्ह्यातील ३९० शेतकऱ्यांना ३२ लाख ७४ हजार ४८९ रुपये आणि सातारा जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना १ लाख १४ हजार ३७६ रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे.