जिल्ह्यात ‘जरंडेश्वर’सह ‘शिवनेरी’चे वजनकाटे करेक्ट; ‘कोरेगाव महसूल’च्या पथकाकडून ऊस वाहतूक वाहनांची तपासणी

0
5

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वरसह शिवनेरी साखर कारखान्याचे वजनकाटे अचूक असल्याचा निर्वाळा महसूल विभागाच्या तपासणी पथकाने दिला आहे. शेतकरी संघटनांकडून सातत्याने सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल व जयपूर येथील शिवनेरी या दोन खासगी साखर कारखान्यांचे वजनकाटे महसूल विभागाच्या वतीने अचानकपणे तपासण्यात आले. यावेळी महसूल, वैधमापन विभागाचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

कोरेगाव तालुक्यातील पथकात प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण, कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम, प्रांताधिकारी कार्यालयातील फौजदारी शाखेचे सहायक महसूल अधिकारी रणजित जाधव यांच्यासह सहकार खात्यातील लेखा परीक्षण विभागातील अधिकारी के. एच. देशमुख, तालुकानिहाय पथकात वैधमापन विभागाचे प्रतिनिधी, पोलिस अंमलदार नागराज कदम, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

या पथकाने चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल व जयपूर येथील शिवनेरी शुगर या दोन खासगी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासले असता त्यात दोन्ही ठिकाणचे काटे अचूक व निर्दोष असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. पथकाने कारखान्यात प्रवेश केल्यावर उसाने भरलेली वाहने, त्यांच्या वजनाच्या पावत्या ताब्यात घेतल्या. पुन्हा वाहनांचे वजन केले त्यानंतर वाहने रिकामी करून वाहनांचे वजन करण्यात आले.