मांढरदेवमधील काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षितपणे पार पाडावी; जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना निर्देश

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वानी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

मांढरदेव, ता. वाई येथे एमटीडीसी हॉलमध्ये मांढरदेव यात्रेची पूर्व नियोजन तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे, मांढरदेव देवस्थानचे प्रशासकीय विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पुणे जिल्ह्यातील भोर उपविभागाचे प्रांताधिकारी विकास खरात, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वाईचे तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील, भोरचे तहसीलदार राजेश नाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, यात्रा उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडायची संयुक्त जबाबदारी ट्रस्ट, प्रशासन आणि स्थानिक या सर्वांची आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे. यात्रेसाठी येणारा प्रत्येक भाविक सुखरुप पणे आला पाहिजे, समाधानाने देविचे दर्शन घेऊन तो परत गेला पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. यात्रेत पशुहत्या होणार नाही याची सर्वोतपरी खबरदारी घ्यावी. या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरीता भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यात्रेदरम्यान देवीचे वार व सुट्टीचे दिवस असल्याने स्थानिक व परराज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने मांढरदेव गडावर उपस्थित राहतात. यासाठी उपलब्ध जागा व सुविधांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.

12 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस असून 13 जानेवारी रोजी देवीची महापूजा व 14 जानेवारी उतरती यात्रा आहे. यात्रेदरम्यान भाविकांना प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यात्रा कालावधीत सामाजिक सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. उपद्रवमुल्य असणाऱ्या शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

खराब दुग्ध व खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी. अन्नपदार्थांचा साठा करुन खराब अन्न पदार्थ विक्री होऊन अन्न विषबाधेच्या घटना घडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध विभागाने विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत. अन्न पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सॅम्पलींग करावे. खाद्यविक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.