कराड प्रतिनिधी । कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स व सातारा जिल्हा परिषद,शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कराड येथे आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी आपल्या सुपीक डोक्यातून अनेक नाविन्यपूर्ण अशी उपकरणे तयार करून आणली आहेत. यामध्ये कराड येथील उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले हायपरलूक ट्रेन उपकरण आणि महाबळेश्वर येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयाच्या निलेश होमकर या विद्यार्थ्याने बनवलेले स्वयंचलित औषध फवारणी यंत्र प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.
समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकून समाज उपयोगी अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे या विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आलेली आहेत याचा निश्चितच या बाल वैज्ञानिकांना त्यांच्या भविष्यातील संशोधन वृत्तीला, सर्जनशीलतेला चालना मिळत आहे.
पहिल्या सत्रात सांगलीच्या बायोराईज अनालिटिकल अँड रिसर्च लॅबोरेटरीचे डायरेक्टर डॉ. महेश चवदार यांचे नैसर्गिक शेती या विषयावर व्याख्यान झाले . त्यांनी नैसर्गिक शेतीच्या संदर्भात स्लाईड शो च्या माध्यमातून सर्व विज्ञानप्रेमी विद्यार्थी व शिक्षक यांना सखोल मार्गदर्शन केले. या परिसंवादाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रा. डॉ .अरविंद जाधव हे होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. अमोल पाटील यांनी करून दिली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस बी. केंगार यांनी केले सूत्रसंचालन प्रा.सौ.पी एस. जाधव यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एल.महामुनी पर्यवेक्षक एस.एन. गाडे स्पर्धा संयोजन समिती सदस्य प्रा.सौ.आर.एस.धोत्रे- पाटील व प्रा. सौ.एम.ए.पुजारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
विविध महाविद्यालयांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्व वैज्ञानिक संशोधक विद्यार्थी शिक्षक यांना भारावून टाकले यामध्ये जागृती विद्यामंदिर, बनवडी, शिवाजी विद्यालय ,कराड,विठामाता विद्यालय,कराड,वेणूताई चव्हाण इंग्लिश मीडियम विद्यानगर, कराड तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी इत्यादी अनेक शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अत्यंत बहारदार केले. या प्रदर्शनात कराड तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला तसेच वेगवेगळ्या उपकरणांची, प्रयोगांची, प्रात्यक्षिकांची माहिती घेतली.
‘या’ नावीन्य उपकरणाचा प्रदर्शनात समावेश
गणितीय रोबोट,कचरा व्यवस्थापन,यांत्रिक सायकल, हवा प्रदूषण नियंत्रण,आकडेवारी सांख्यिकीय गणितीय, मानवी श्वसन व उत्सर्जन संस्था प्रतिकृती,कार्बन शुद्धीकरण, कचरा पृथक्करण प्रणाली कोरडे ओले धातूचे प्रथम,प्लास्टिक निर्मूलन उपाय,आपत्कालीन विद्युत जनित्र,महिला संरक्षण उपकरण,स्वयंचलित औषध फवारणी यंत्र, नदी पुलावरील सिग्नल यंत्रणा,हायपरलूप ट्रेन, नैसर्गिक कुंडी, इलेक्ट्रिक नांगरणी कळवणे यंत्र, द्वीपद्धतीचे विस्तारित रूप, गणित प्रयोगशाळा, बौद्धिक खेळातून विज्ञान शिक्षण, प्रकाशाचे परावर्तन, सूर्यग्रहण चंद्रग्रहण, खेळातून शिक्षण इत्यादी अनेक प्रकारची उपकरणे या विज्ञान प्रदर्शनामध्ये उपलब्ध झालेली आहेत.