कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काले येथील डॉ. संजय कुंभार यांची नुकतीच जिल्हा हिवताप अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कुंभार यांनी नुकताच हिवताप अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कुंभार यांनी काम पाहिले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे नुकतीच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील हिवताप अधिकारीपदी डॉ. कुंभार यांची नियुक्ती करत आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कमलापूरकर, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कराड तालुक्यातील काले गावातील असलेल्या डॉ. संजय कुंभार हे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेत गेली 22 ते 23 वर्ष कार्यरत आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील काम, कोरोना महामारीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रजयेथील उल्लेखनीय काम पाहिले. त्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारीपदी नियुक्तीपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. डॉ. कुंभार यांनी काही काळ कराड पंचायत समिती येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती.
हिवतापाच्या निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करणार : डॉ. संजय कुंभार
जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष करून संसर्गजन्य आजार हिवताप, मलेरिया अशा आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून डासांपासून निर्माण झालेल्या आजाराच्या रुग्णावर देखील उपचार केले जात आहेत. हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध महत्वाचा आहे. हिवतापाच्या निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.