सातारा प्रतिनिधी | रब्बी हंगामास पोषक वातावरणामुळे रब्बी पेरणी वेळेत सुरू झाल्याने या हंगामात शंभर टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकांची सरासरी इतक्या क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, यापैकी दोन लाख १५ हजार २६७ हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. यामध्ये रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख ३० हजार १०१ हेक्टर पेरणी झाली आहे.
माण तालुक्यात सर्वाधिक ४६,७६५ क्षेत्रावर पेरणी झाली असून, उगवण चांगली झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण ३७ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त ४० हजार २२६ हेक्टरवर लागवड झाली आहे. मक्याचे १० हजार ११७ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १५ हजार २५० हेक्टर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे २७ हजार ७५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त २७ हजार ८२७ पेरणी झाली आहे.
गहू, हरभरा, मका या पिकांची शंभर टक्क्यांपेक्षा जास्त, तर रब्बी ज्वारीची ९५.९९ टक्के पूर्ण झाली आहे. थंडी व पावसामुळे पिकांच्या अवस्था चांगल्या आहेत. दुष्काळी तालुक्याचा हा हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात जास्त पेरणी झाली आहे. कांदा पिकांस समाधानकारक दर मिळाल्याने कांदा लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
१६ ते १७ हजार क्षेत्रावर कांदा लागवड
जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या सहा तालुक्यांत १५,५३९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अजूनही कांदा लागवड सुरू आहे. पश्चिमेकडील सातारा, कराड, पाटण या तालुक्यांत कांदा लागवड केली जात आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पेरणी हेक्टरमध्ये
सातारा : १५,४९१
जावळी : ७०२७
पाटण : १७,४४०
कराड : १४,३४२
कोरेगाव : २१,३३४
खटाव : ३३,९९६
माण : ४६,७६५
फलटण : ३१,१७८
खंडाळा : १३,४६५
वाई : १३,५६९
महाबळेश्वर : ६६८