सातारा शहर पोलिसांना मिळणार वाढदिवसाची सुट्टी!; नवीन वर्षात महत्वाचा निर्णय

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सातारा जिल्ह्यातील सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आनंदादृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची सध्या जिल्हाभर नाही तर राज्यभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबियांसमवेत पूर्ण वेळ देता यावा, यासाठी त्यांना विशेष सुटी दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी हा उपक्रम चालू केला आहे. यामुळे पोलिसांचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत. राज्यातील पोलिस ठाण्यापैकी हा महत्वाचा निर्णय घेणारं सातारा शहर पोलिस ठाणे हे एकमेव असे पोलिस ठाणे ठरले आहे.

पोलीस दलात काम करतांना पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अल्प आहे. १२ घंटे काम करण्यासमवेतच यात्रा बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, ऐनवेळी उद्भवणारे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न यांसाठी अविरत काम करावे लागते. यामुळे पोलिसांचे स्वास्थ्य सतत अस्वस्थ रहाते. कामाचे अनिश्चित स्वरूप असल्यामुळे पोलिसांचे जेवणही अवेळी होते. पोलिसांना या सर्व कामातून किमान त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला आणि कुटुंबियांना वेळ देता यावा, या उद्देशाने नववर्षानिमित्त सुटीची भेट देण्यात आली आहे.

ज्या पोलीस कर्मचार्‍यांचा दुसर्‍या दिवशी वाढदिवस आहे, त्या पोलीस कर्मचार्‍यांचा आदल्या दिवशी पोलीस ठाण्यात केक कापून वाढदिवस साजरा करायचा आणि त्याला शुभेच्छा द्यायच्या, तसेच दुसर्‍या दिवशी त्या पोलीस कर्मचार्‍याला विशेष सुटी संमत करायची. असा उपक्रम १ जानेवारीपासून चालू करण्यात आला आहे.

निर्णयामुळे पोलिस कर्माचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण : पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के

सातारा जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या काळात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील जास्त कामाचा ताण सहन करावा लागला. वर्षातील प्रत्येक सण आणि उत्सव काळात पोलीस कर्मचारी असो किव्हा अधिकारी यांना काम असतेच ते काम तो अतिशय कर्तव्यपूर्वक पार पाडत असतो. मात्र, वर्षातून एकदा त्याचा वाढदिवस येत असतो. अशावेळी किमान वाढदिवस आपण आपल्या कुटुंबासमवेत साजरा करावा असे त्याला वाटत असते. त्याला तो करता यावा या हेतूमुळे आम्ही हा निर्णय घेतला. आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.