कराड रेल्वे स्थानकात पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनजवळील बॉक्सला आग; गाडीतील 300 हून अधिक प्रवासी सुखरूप

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वे डेमो प्रवासी गाडीच्या (क्र. ११४२५) इंजिनजवळील अॅक्सल बॉक्सला कराड येथील रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांच्यात एकच धावपळ उडाली. रेल्वेच्या एकूण सात डब्यांत सुमारे ३०० हून अधिक प्रवासी होते.

घटनेनंतर या डेमो रेल्वे गाडीतील प्रवाशांना सातारा – पंढरपूर रेल्वेने मार्गस्थ करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून कोल्हापूरकडे रेल्वे डेमो प्रवासी गाडी निघाली होती. गाडीतील (क्र. ११४२५) इंजिनजवळील अॅक्सल बॉक्सला आग लागल्याचे
डेमो रेल्वे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने स्थानक प्रमुखांशी तत्काळ संपर्क साधत आगिबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली.

रेल्वे स्थानकातील १४ अग्निशमन यंत्रांद्वारे आग विझविण्यात यश आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. दरम्यान, कराड पालिकेचा अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले चालकाच्या प्रसंगावधान व तत्परतेने आग विझविण्यास मदत झाली.

या घटनेनंतर मिरजेहून रेल्वेचे सीएनडब्ल्यू पथक घटनास्थळी सायंकाळी पाहणीसाठी आले होते. आग निश्चित कशामुळे लागली?, या कारणाचा शोध घेतला जात आहे. कराड रेल्वे स्थानकातील आरपीएफ पोलिस अधिकारी एस. एन. रेड्डी, पोलिस ए. के. घाडगे, जी. बी. संदीप, अमर देशमुख, मुकुंद डुबल, रेल्वे स्थानक प्रमुख अॅलेक्झांडर व त्यांचे सहकारी, कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुखरूप ठेवण्यास मदत केली.