रस्त्यावर खोदलेल्या पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यात दुचाकी आदळून युवती ठार तर 2 गंभीर जखमी

0
5

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद – निरा या पालखी मार्गावरील माणिक सोना पेट्रोल पंपासमोर रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यात आदळूनअपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात शाळेत जाणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी रास्तारोको करत संबंधित ठेकेदारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील लोणंद ते नीरा या मार्गावर आज सोमवार दि. ६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माणिक सोना पेट्रोल पंपासमोर बालुपाटलाच्या वाडी येथील तिघेजण दुचाकीवरून निरा बाजूला जात होते. पेट्रोल पंपासमोर पाण्याची लिकेज काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी उडाली. त्यावेळी दुचाकीवरील अंकिता अनिल धायगुडे (वय 20) ही शाळकरी मुलगी जागीच ठार झाली तर विशाल दौलत धायगुडे (वय 27) व सानिका विलास धायगुडे (वय 18 रा. बालुपाटलाचीवाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर आक्रमक झालेल्या बालुपाटलाची वाडी येथील ग्रामस्थांनी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी चौक येथे सुमारे अर्धा तास अडवून धरत दोषींवर गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी भेट दिली. या प्रकरणी संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.