पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ‘त्या’ दोन भोंदू मांत्रिकांवर गुन्हा दाखल

0
105
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात भोंदू बाबांनी एक सेवानिवृत्त अधिकाऱ्यास ३६ लाखांना गंडा घातल्याची एक घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन भोंदू मांत्रिकांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अखेर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

मंगेश गौतम भागवत (वय ३२, रा. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे), सर्जेराव संभाजी वाघमारे (७०, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्या भोंदू मांत्रिकांची नावे आहेत. कांता वामन बनसोडे (६०, रा. देवापूर, ता. माण) हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकांनी दैवीशक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडत असल्याचे त्यांना व त्यांच्यासह अन्य चाैघांना आमिष दाखविले.

पूजेच्या साहित्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये बनसोडे यांनी सर्वांच्यावतीने वेळोवेळी फोन पेद्वारे भोंदू मांत्रिकांना पाठविले. ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये तब्बल ३० कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले; पण हे बाॅक्स उघडल्यानंतर त्यामध्ये वर्तमानपत्रांची रद्दी निघाली. आपली फसवणूक झाल्याचे बनसोडे व अन्य लोकांना समजल्यानंतर भोंदू मांत्रिकांकडे त्यांनी पैसे परत मागितले. परंतु त्यांचे पैसे परत दिले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून तक्रारदार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची काेणीही दखल घेतली नव्हती. अखेर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.