नितीशकुमार गेले तरी केंद्र सरकाराला धोका नाही; जयंत पाटील असं का म्हणाले?

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कराड तालुक्यातील उंडाळे येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी केंद्र सरकारला काही धोका उद्भवणार नाही, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल, अशा चर्चा सुरू आहेत. बिहारचं नेतृत्व कुणी करायचं? यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षात शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या नेतृत्व बदलाचे संकेत दिल्याने नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जातं आहे. शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले, तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकतं, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, नितीश कुमारांकडे एकूण 12 खासदार आहेत. ते 12 खासदार बाहेर गेले तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल, असं दिसत नाही. त्यांच्याकडे सध्या 291 च्या आसपास बहुमत आहे.

त्यामुळे नितीश कुमार बाजूला झाल्याने केंद्र सरकार अल्पमतात येईल, असं मला आकड्यांवरून तरी वाटत नाही. नितीश कुमारांना एकट्याला हा निर्णय घेता येणार नाही. त्यांच्यासोबत आणखी दोन-तीन मोठे खासदार असलेले पक्ष आहेत. त्या दोघा-तिघांनी निर्णय घेतला तर सरकार अल्पमतात येईल, असं आपल्याला म्हणता येईल. केंद्रात नितीश कुमार यांच्या पक्षाप्रमाणे केंद्र सरकारला पाठिंबा देणार्‍या अन्य पक्षांची अधिक संख्या असणारे खासदार आहेत.