सातारा प्रतिनिधी | सातारा येथील सातारा जिल्हा कारागृहामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दि. 4 जानेवारीपासून सातारा विपश्यना समिती यांच्या माध्यमातून ‘आनापान ध्यान व विपश्यना सत्र’ कारागृहातील बंद्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.
कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य “सुधारणा पुनर्वसन” या तत्त्वानुसार कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सातारा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे हे सातत्याने कारागृहातील बंद्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम करीत असतात.
याचाच भाग म्हणून 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारागृहातील बंद्यांच्या आचार विचारांमध्ये सकारात्मक बदल व्हावा व सामाजिक बांधिलकी त्यांच्या मनामध्ये जपून राहावी, यासाठी त्यांच्या विचारांवर व मनावर चांगला बदल घडून येण्यासाठी सातारा विपश्यना समितीचे अध्यक्ष दिलीप उत्कुर व लोकल फंड ऑडिटचे असिस्टंट डायरेक्टर, उमेश गायकवाड यांच्या सहकार्याने “आनापान ध्यान व विपश्यना सत्र” सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमास लोकल फंड ऑडिट, विपश्यना समितीचे सदस्य हर्षल कदम, डॉ. राहुल जाधव तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार दत्ताजी भिसे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार सुदाम बर्डे, शिपाई यशवंत पाटील, तानाजी बुडगे, सागर मासाळ, बालाजी मुंडे, तुकाराम घुटुकडे, काजल सायमोते इत्यादी उपस्थित होते.