जवान प्रमोद कदम यांच्यावर शासकीय इतमामात पुसेसावळीत अंत्यसंस्कार

0
5

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील जवान प्रमोद जगन्नाथ कदम (वय ४०) यांना सेना सेवा कोअर ५१४ बटालियन डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्यावर रविवारी पुसेसावळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

जवान कदम यांना देशसेवा बजावत असतानाच वीरमरण आले. याची माहिती मिळाल्यानंतर पुसेसावळीसह पंचक्रोशीवर दुःखाचे सावट पसरले. त्यांचे पार्थिव आज सकाळी नऊ वाजता पुसेसावळीत दाखल झाले. त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘जवान प्रमोद कदम अमर रहे, भारतमाता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने सर्वांचीच मने हेलावून गेली. यावेळी त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा स्वराज याने भडाग्नी दिला.

यावेळी सातारा पोलिस दलाच्या वतीनेही बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, सचिव डी. एफ. निंबाळकर, जिल्हा सैनिक कार्यालयाचे संभाजी पवार, राजेंद्र मांडवेकर, भाग्यश्री भाग्यवंत, जितेंद्र पवार, संतोष घार्गे, चंद्रकांत पाटील, सुरेश पाटील, सचिन कदम, नितीन वीर, सुनंदा माळी, मंडलाधिकारी प्रमोद घोरपडे, तलाठी तानाजी काटकर, सुभेदार शिवाजी घेवारे, सुभेदार नामदेव तांदळे, कमांडर अमर पाटील, अनिल पवार, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते, राहुल वाघ, सातारा पोलिस दलातील कर्मचारी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक, आजी-माजी सैनिक, महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.