पैशाचा पाऊस पडतो म्हणून भोंदू बाबाने दिले बंदिस्त बॉक्स; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला घातला 36 लाखांना गंडा

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अजूनही भोंदूगिरीच्या नावाखाली पैसे लुटण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच घटना जिल्ह्यात उघडकीस आली असून घरातील काळूबाई देवीसमोर भाेंदू मांत्रिकाने सहा बंदिस्त बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये ३० कोटी रुपये आहेत. पण, हे बाॅक्स २१ दिवसांनंतर उघडा, असे मांत्रिकाने सांगितले. आपल्याला एवढे पैसे मिळाले म्हणून सर्वजण खूश होते. जेव्हा २१ व्या दिवशी हे बाॅक्स उघडले तेव्हा त्यामध्ये चक्क वर्तमान पत्रांची रद्दी निघाली. अशा प्रकारे संबंधित भोंदूबाबा आणि त्याच्या पिलावळीने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या माण तालुक्यातील देवापूर मध्ये वय वर्ष ६० असलेले कांता वामन बनसोडे हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकासह दोघांनी दैवीशक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले. मात्र, त्यासाठी पूजेचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले. या साहित्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये बनसोडे यांनी फोन पेद्वारे संबंधितांना पाठविले.

इतकेच नाही तर बनसोडे यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही पूजेसाठी कोणी १२ लाख, तर कोणी ८ लाख भोंदू मांत्रिकाकडे दिले. ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये तब्बल ३० कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण, हे बाॅक्स २१ दिवस पूर्ण झाल्यानंतरच उघडायचे, असे त्याने त्यांच्याकडून वदवून घेतले.

बंदिस्त बाॅक्स बनसोडे व इतर लोकांनी घरी नेल्यानंतर सर्वजण २१ दिवस कधी पूर्ण होताहेत, याची वाट पाहात होते. अखेर तो दिवस उजाडणार तोच मांत्रिकाने फोन करून सांगितले, बाॅक्स उघडू नका. तांत्रिक अडचण आली आहे. आणि त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलं मांत्रिकाने दिलेले सहा बाॅक्स उघडण्यापूर्वी बनसोडे यांच्यासह अन्य तक्रारदारही एकत्र आले. या सर्वांनी निर्णय घेतला की मांत्रिकाचे आपण काहीही ऐकायचे नाही. आपण बाॅक्स उघडायचे आणि या सर्व प्रकारचे मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करायचं त्यांनी ठरवलं. हळूहळू सहा बाॅक्स त्यांनी उघडण्यास घेतले. सर्व बाॅक्स उघडून झाल्यानंतर त्यामध्ये तीस कोटी नव्हे तर चक्क वर्तमानपत्रांची रद्दी निघाली. अशा प्रकारे संबंधितांची भोंदूबाबाने फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.