मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘कृष्णा’च्या शिरवळातील उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्र्यांच्या वतीने आज खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्र्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिंदेवाडी – शिरवळ येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरमधून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिंदेवाडी – शिरवळ येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॅम्पसस्थळी आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ होते. तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, आ. मनोज घोरपडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांसमोर कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या नव्या कॅम्पसच्या उभारणीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ज्ञानार्जनाची गुणवत्ता वाढेल, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात मोठे यश मिळवण्यास प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी माजी आमदार मदन भोसले, भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. सुरभी भोसले, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजी भिडे गुरुजींची विशेष उपस्थिती

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसस्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी विशेष उपस्थिती लावली होती. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कॅम्पसस्थळी भिडे गुरुजींचा चरणस्पर्श लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.