सातारा प्रतिनिधी । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या जन्मगावी असलेल्या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीमाई उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह विविध नेत्यांनी उपस्थित राहत अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्यासोबत केलेल्या प्रवासामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, आज छगन भुजबळ यांच्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे कसं नेता येईल”, या विषयी चर्चा झाली. त्यांनी देशाला दिशा देण्याच काम केलय. तो विचार सर्वांपर्यंत कसा पोहोचवता येईल, समतायुक्त भारतीय संविधान मानणारा समाज कसा बनवता येईल याविषयी चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
खंडाळा तालुक्यातील नायगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, मंत्री अतुल सावे, जेष्ठ नेते छगन भुजबळ, फलटणचे आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुर्हूतमेढ रोवली. विधवा व परित्क्या यांना त्यांनी जगण्याचा अधिकार दिला. समाजातील कुप्रथा संपवल्या. आज त्यांना अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्या मूळगावी आलो आहे. “मी त्यांना अभिवादन केलं. नुकतचं त्यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या स्मारकाचा एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून होत आहे. त्याचं मी प्रेझेंटेशन घेतलं. लवकरात लवकर विस्तारित स्वरुपात हे स्मारक व्हावं असा आमचा प्रयत्न असेल.