कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावाची ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झाली होती त्या भिमराव दादा पाटील यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. जेष्ठ नेते भिमराव दादा पाटील यांच्याबद्दल मुक्त पत्रकार संपत मोरे यांनी लिहलेली पोस्ट व्हायरल झालेली आहे.
काले म्हटलं की, भिमराव दादा हे समीकरण अगदी 1975 पासून सातारा जिल्ह्यात रूढ झालेले. त्यांनी कराड पंचायत समितीचे सभापतीपद काहीकाळ भूषवलेले. त्यानंतर जिल्हा परिषदेत अनेक काळ जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती होते. मोबाईल सर्वांच्याकडे आलेले दिवस आणि दादा जिल्हा परिषद सभापती होते. तेव्हा दादांच्याकड मोबाईल नव्हता. कशाला मोबाईल पायजे मला.. सकाळी घरी असतो. रात्री घरी असतो. लोकांना भेटायची तीच वेळ. मग मोबाईल कशाला सोबत घ्यायचा.. एवढं काय महत्वाचे घडणार आहे.? असा त्यांचा रोकडा सवाल होता.. त्याच्या बातम्याही झालेल्या.
कराड तालुक्यातील पृथ्वीराज चव्हाण, विलासराव उंडाळकर, जेष्ठ विचारवंत माजी सहकारमंत्री यशवंतराव मोहिते, पी डी पाटील असे मोठे नेते. पण भिमराव दादांनी कधी या सर्व नेत्यांच्या हो ला हो केले नाही. रांगड्या भाषेत ते या नेत्यांना सुनवायला मागे पुढे बघत नसतं..
त्यांची वक्तृत्वशैली ग्रामीण म्हणजे अगदी गावठी आणि लोकांना भावणारी होती. 1994 च्या कृष्णा कारखाना निवडणुकीत त्यांनी अवघ्या पाच मिनिटाचे केलेल्या रांगड्या भाषणाची आजही वाळवा कराड कडेगाव खानापूरच्या लोकांच्यात चर्चा असते. ज्यांनी ते भाषण ऐकले त्यांनी आहे तसे पुढे पोहोचवले. सोशल मीडिया नसताना…
आमदार होण्याची क्षमता असलेला पण काही कारणाने आमदार न झालेला हा नेता होता. पण आमदार झाले नाहीत म्हणून त्यांचे महत्व कमी झाले नाही की रुबाब कमी झाला नाही. कृष्णाकाठी कायमच भिमराव दादा आणि काले यांची चर्चा होतं राहिली. दादांना विनम्र अभिवादन..