सातारा प्रतिनिधी | नुकताच ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. नववर्षाचे स्वागत करण्याच्या आदल्यादिवशी मात्र, पोलीस आणि आरटीओ विभागाने मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर चांगलीच कारवाई केली. मद्यप्राशन करुन वाहन चालवणार्या चालकांविरुध्द प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. सातारा, कराड व फलटण आरटीओच्या वायूवेग पथकाकडून महामार्गावर विविध ठिकाणी सुमारे 500 हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली.
परिवहन आयुक्त कार्यालयाने दि. 1 जानेवारीपर्यंत दिवसा व रात्री महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गावर वायूवेग पथकामार्फत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली. तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षक संजय कांबळे, रविंद्र चव्हाण, दिग्वीजय जाधव, योगेश ओतारी, गजानन गुरव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितीन गोणारकर, भारती इंगळे, नवनाथ देठे, चेतन पाटील, योगेश मोरे, शुभांगी बुरूंगले, प्रफुल्ल सकुंडे, संग्राम देवणे, तेजस्विनी कांबळे या अधिकार्यांची पथके तैनात करण्यात आली आहे.
पथकाने सुमारे 500 हून अधिक वाहनांची तपासणी केली असून सुमारे एक वाहन चालक मद्यप्राशन करुन वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आला असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 69 वाहने दोषी आढळून आली असून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले.