सातारा प्रतिनिधी । कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मकरंद पाटील (Makrand Patil) यांचे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात गत आठवड्यात जोरदार स्वागत करण्यात आले. उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या मकरंद आबांची चक्क घोड्यावरून आणि बैलगाडीतून मिरवणूक काढली. त्यानंतर महायुती सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री झालेल्या मकरंद पाटील यांनी आज बुधवारी मुंबई येथे जाऊन मंत्रालयात प्रत्यक्ष मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.
मदत व पुनर्वसनमंत्री म्हणून पदभार स्विकाररण्यापूर्वी मुंबई येथील मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मंत्री मकरंद पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदन पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होते. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदाची हुलकावणी दिली होती. अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या मकरंद जाधव पाटील यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवले आहे,आता मकरंद पाटील यांना मंत्रीपद देऊन अजित पवारांनी वाईत डबल धमाका केला आहे.