मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी जिल्ह्यात ग्रामपंचायती बंद; हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याच्या वतीने २ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी सातारा जिल्ह्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना शासकीय कामांसाठी अडचण आली.

सातारा जिल्ह्यात मंगळवारी अनेक ग्रामपंचायतींमधील कामे बंद ठेवण्यात आलेली होती. यामुळे ग्रामपंचायतीत कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागले. त्यातच आणखी दोन दिवस ग्रामपंचायती बंद राहण्याने कामावरही परिणाम होणार आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास मुंबईतही आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. हे कर्मचारी मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.