सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुखांना पोलिसांच्या वतीने सातारा, पुणेसह सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले.
टोळी प्रमुख मनोज ऊर्फ महेश गणपत इंगळे (वय २४, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ, फलटण, जि. सातारा), टोळी सदस्य सोनल गणेश इंगळे (वय ३१, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ, फलटण, जि. सातारा) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित दोघा जणांच्या टोळीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, घरफोडी चोरी करणे, दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे गुन्हे दाखल होते.
फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल आर धस यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांच्यावर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुन ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर टोळी प्रमुख १) मनोज ऊर्फ महेश गणपत इंगळे व टोळी सदस्य २) सोनल गणेश इंगळे यांची सुनावणी झाली. त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा बापु धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
१५२ इसमांविरुध्द तडीपारची कारवाई
नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे ३४ उपद्रवी टोळयांमधील ११० इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १५२ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.