हिटमॅन रोहित शर्माचा भाऊ क्रिकेटर विशाल शर्माने रहिमतपूरमधील खेळाडूंशी साधला संवाद

0
3

सातारा प्रतिनिधी | सिंगापूर क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन चेतन सुर्यवंशी व भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा भाऊ बंधू क्रिकेटर विशाल शर्मा (Vishal Sharma) याने नुकतीच कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत सिंगापूर टीमचा माजी कॅप्टन चेतन सुर्यवंशी (Chetan Suryavanshi) याने देखील उपस्थिती लावली. रहिमतपूर येथील माऊली एज्यु. केअरच्या पारितोषिक वितरण समारंभात उपस्थित राहून विशाल शर्माने येथील खेळाडूंशी मनमोकळा संवाद देखील साधला.

WhatsApp Image 2024 12 31 at 4.07.48 PM

रहिमतपूर येथील पंचक्रोशीच्या ‘चैत्रबन’ परिसरात पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम, हर्षवर्धन कदम, सौ. प्रियंका कदम, प्राचार्या डॉ. भाग्यश्री जाधव, प्राचार्य जे. एन माने, प्राचार्य पी. पी. वावरे, प्राचार्या सौ. माधुरी भोसले या मान्यवरांसह शेकडो चाहत्यांनी यावेळी सिंगापूर टीमचा माजी कॅप्टन चेतन सुर्यवंशी व विशाल शर्मा या दोघांचे जोरदार स्वागत केले. पारितोषिक वितरण समारंभानंतर या दोघांनी रहिमतपूरमधील चाहत्यांशी व खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधला. क्रिकेट खेळाबरोबरच, कबड्डी, कुस्ती फुटबॉल खेळाडूंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची प्रेरक उत्तरे त्यांनी दिलखुलासपणे दिली.

यावेळी चेतन सुर्यवंशी म्हणाले की, कोणत्याही खेळाचे बेसिक हे सहा ते सोळा या वयोमर्यादेत तयार होत असते. करिअर सहज साध्य होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एकदा ध्येय निश्चित झाले की त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. खेळात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास मनोबल, दृढनिश्चय महत्वाचा असतो. योग्य मार्गदर्शकाबरोबरच सकारात्मक विचारांची माणसे जवळ असावी लागतात. क्रिकेटसारख्या खेळात यशस्वी होण्यासाठी हजार तास वेळ द्यावा लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटपर्यंत टिकून राहता आले पाहिजे. वेळेप्रसंगी संयम बाळगावा लागतो. अलिकडे क्रिकेट खेळ कमर्शियल झाला आहे. या खेळात अनेक संधी आहेत.

यासाठी पाया भक्कम असणे आवश्यक आहे. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे ती माणसांची क्षमता तपासते. आणि त्याला यशाच्या मार्गावर पोहचवते. शारीरिक मानसिकदृष्टया सक्षम असल्याशिवाय मनोबल वाढत नाही. यासाठी मेडिटेशन, योगा, व्यायाम करणे गरजेचे आहे. तरुणांनी स्वप्न पाहायला हवीत, ती सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष करायला हवा. जेव्हा संधी चालून येते तेव्हा त्या संधीचे सोने आपल्याला करता आले पाहिजे. यासाठी संघर्षातून पुढे गेलेल्या अनेक व्यक्तींचा आदर्श आपणासमोर असायला हवा.

यावेळी चित्रलेखा माने – कदम म्हणाल्या की, रहिमतपूरमधील खेळाडूंनी कुस्ती, खो खो, क्रिकेट, फुटबॉल , कबड्डी या सारख्या खेळात जिल्हा , विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळविला आहे. या खेळाडूंना अजुनही पुढे उंच भरारी घेण्यासाठी सरावातील सातत्य आणि मार्गदर्शनाची गरज आहे. क्रिकेटसारख्या खेळात वेळीच आपले व आपल्या सिंगापूर अकॅडमीचे मार्गदर्शन झाले तर येथील खेळाडू कमर्शियल खेळाच्या माध्यमातून पुढे जाण्यास मदत होईल. आपण सातारा जिल्ह्यातील क्रिकेटपटूसाठी रहिमतपूर येथे क्रिकेट करिअर मार्गदर्शन अकॅडमी स्थापन करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवराज गायकवाड यांनी केले. श्री श्रीकांत पोळ यांनी आभार मानले.

रहिमतपूरमध्ये क्रिकेट करिअर अकॅडमी सुरु करु : चेतन सुर्यवंशी

रहिमतपूर व सातारा जिल्ह्यातही क्रिकेट खेळणारे चांगले खेळाडू आहेत. ते पुढे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आपण जर काही सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे रहिमतपूरसारख्या ठिकाणी आमच्या सिंगापूर येथील अकॅडमीच्या माध्यमातून ‘क्रिकेट करिअर अकॅडमी’ सुरु करता येईल. यासाठी निश्चित प्रयत्न करु असे आश्वासन यावेळी चेतन सुर्यवंशी व विशाल शर्मा यांनी दिले.