सातारा प्रतिनिधी । ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारत देशाला सन १९५२ साली पहिले पदक मिळवून देणारे सातारा जिल्हाचे सुपुत्र कै. पै. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जन्मदिन दि. १५ जानेवारी हा “राज्य क्रीडा दिन” (State Sports Day) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त खेळाडू व राज्य क्रीडा पुरस्कार्थीचा ट्रॅकसूट, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे.
दि. १५ जानेवारी, २०२४ रोजी राज्य क्रीडा दिन व ऑलिम्पिकवीर कै.पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सन २०२३-२४ (०१ जुलै, २०२३ ते ३० जून, २०२४) या शैक्षणिक वर्षातील शालेय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने मान्यता दिलेल्या अधिकृत एकविध संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू, राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडू/कार्यकर्ता यांनी प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह विहित नमुण्यातील आपले अर्ज दि. ६ जानेवारी, २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करणे आवश्यक आहे.
खेळाडूंनी अर्ज सादर करताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याव्यात : नितीन तारळकर
संघटनांच्या स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी अर्ज सादर करताना, अर्जासोबत जिल्हा संघटनेची शिफारस असणे बंधनकारक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.