कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शिरवडे येथील शाळेत शिकणाऱ्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कराड तालुक्यातील शामगाव गावच्या हद्दीत ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
शेखर दत्तात्रय जगदाळे (वय १४, रा. शिरवडे) असे मृत मुलाचे नाव आहे. या मुलाचा घातपात झाला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर सदर शेखर जगदाळे या मुलाचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत झाल्यानेच मृत्यू झाला असल्याची माहिती आज तळबीड पोलिसांनी दिली.दरम्यान, हलगर्जीपणे वाहन चालविल्याने व त्यात सोबतच्या मुलाचा मृत्यू झाल्याने ट्रॅक्टर चालक अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले आहे.
तळबीड पोलिसांत आकस्मित मयत म्हणून या घटनेची नोंद झाली आहे, तसेच अपघाताची घटना मसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मसूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.