सातारा प्रतिनिधी | पुसेगाव येथे आयोजित श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिली.
पुसेगाव येथे आयोजित श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री श्री.भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, डॉ. प्रिया शिंदे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन सुरेश जाधव यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
मंत्री श्री. भोसले म्हणाले की, या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळावे. स्थानिकांचे सहकार्य लाभल्यास कामे गतीने होतात. उरमोडी धरण हे सातारा तालुक्यात आहे. त्याचे पाणी आज दुष्काळी माण-खटाव तालुक्यात जात आहे, यामुळे येथील ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
माण, खटाव व कोरेगाव तालुक्याला बारमाही पाणी मिळण्यासाठी सोळशी येथे धरण बांधण्यात येत आहे. या धरणातील पाणी जावली तालुक्यालाही मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन या धरणासाठी सहकार्य केले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पुसेगाव गावासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या दिल्या जातील असेही मंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.